स्थापना दिवस
दर वर्षी 11 ऑगस्टला आमचा स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गेल्या वर्षी आमच्या पतपेढीने 47 वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली. या विशेष प्रसंगी माजी आणि नवीन संचालक मंडळातील सर्व सदस्यांना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. मुंबईत राहणाऱ्या शिकलगार समाजाला शिकलगार जमात ट्रस्टच्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिफोन द्वारे कार्यक्रमाची माहिती पुरवण्यात आली होती. 11 ऑगस्ट 2024 रोजी रविवार असल्याने स्थापना दिवस 10 ऑगस्ट 2024 रोजीच साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा वेळी रंगीबेरंगी रिबन आणि फुग्यांनी शाखेचे कार्यालय सुंदर सजवण्यात आले होते. सर्व माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी एकेक करून पतपेढीशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दलल आणि पतपेढीने त्यांच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडवला याबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी अत्यंत भावनिक भाषण दिले. त्यांनी पतपेढीचा संपूर्ण इतिहास, 1977 पासून पतपेढीने अनुभवलेले चढ-उतार आणि आज तिचे रुप कसे बदलले आहे, याबद्दल सांगितले. तसेच त्यांनी ज्येष्ठ संस्थापक सदस्यांचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांचीही आठवण करून दिली. त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्वांच्या प्रयत्नांनी भविष्यात आणखी मोठी उंची गाठू अशी आशा व्यक्त केली.